अलिबाग (प्रतिनिधी): राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF), थळ यांच्या वतीने आणि नंदाई एडुटेक फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित “स्वप्नांची चाके – आदिवासी मुलांना सायकल वाटप” हा उपक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आरसीएफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कुरुळ कॉलनी येथे झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
निगमित सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देणे हा होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व उद्घाटनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली. या वेळी आरसीएफ थळचे कार्यकारी संचालक श्री. नितिन हिरडे तसेच नंदाई एडुटेक फाऊंडेशनच्या डॉ. भगवती नंदा नंदगिरी प्रमुख उपस्थित होते. विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील, तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या मनोगतात, सायकली मिळाल्यामुळे शिक्षणाची वाट अधिक सुलभ होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते आदिवासी विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. या सायकली केवळ प्रवासाचे साधन नसून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना गती देणारी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी निर्माण करणारी महत्त्वाची पायरी असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य राहील, शाळाबाह्य प्रमाण कमी होईल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.






