रायगड (प्रतिनिधी): अलिबाग येथे पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरची सुरुवात करण्यात आली. पीएनपी नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आयईएसपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी खन्ना यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याचे सांगत, स्थानिक युवकांनी कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले.
शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी ग्रामीण भागातील युवकांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले. या केंद्रात एअर होस्टेस, केबिन क्रू, एअरपोर्ट ऑपरेशन, हॉस्पिटेलिटी, हेल्थकेअर सपोर्ट, कम्युनिकेशन स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास आणि कॉर्पोरेट ट्रेनिंगसारखे अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सहाय्यही दिले जाणार आहे.
या कार्यक्रमाला प्रशांत नाईक, नृपाल पाटील, मानसी म्हात्रे, अनिल चोपडा, प्रवीण ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. रविवारपासून गोंधळपाडा-वेश्वी येथे प्रशिक्षण केंद्र प्रत्यक्ष सुरू होणार आहे.






