राष्ट्रवादीत ‘पॉवर सेंटर’ची नवी लढाई? ऑडिओ क्लिप, आर्थिक व्यवहार आणि दिल्लीतील ‘नो एन्ट्री’ चर्चेने खळबळ


प्रफुल्ल पटेल–सुनील तटकरे साईडलाईन झाल्याच्या चर्चांना उधाण; पक्षात ‘क्लिनअप ऑपरेशन’ सुरू असल्याची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पडद्यामागे मोठी राजकीय घडामोड सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. एका कथित ऑडिओ क्लिपमुळे पक्षात अंतर्गत वादळ निर्माण झाल्याचं बोललं जात असून, कालपर्यंत पक्षाचे रणनीतीकार आणि सत्तेच्या राजकारणातील ‘चाणक्य’ मानले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबत अचानक वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. “हम सब एक हैं”चा नारा देणाऱ्या पक्षात आता अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर येत असल्याचं चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांतील घटनांची मालिका पाहिली तर या चर्चांना अधिक बळ मिळत आहे. सर्वप्रथम, पटेल आणि तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नरेश अरोरा अचानक संघटनात्मक घडामोडींमधून साईडलाईन झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर दिल्लीतील पक्ष संघटनेवर पकड मजबूत करण्याच्या हालचालींना धक्का बसल्याचं बोललं गेलं. पुढे पक्षाच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले आणि कालपर्यंत पक्षाचे ‘पॉवर सेंटर’ समजले जाणारे काही दिग्गज नेते अचानक नामधारी पदांवर गेल्याची चर्चा रंगली.
विशेष म्हणजे, या फेरबदलांबाबत “क्लेरिकल मिस्टेक” झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. मात्र, इतक्या मोठ्या राजकीय बदलामागे केवळ तांत्रिक चूक असू शकते का, असा सवाल आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पक्ष संघटनेची महत्त्वाची सूत्रे नव्या नेतृत्वाकडे दिली गेली असून पक्षाच्या आर्थिक व्यवहारांवरही नव्या टीमचा प्रभाव वाढत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पक्षात नवं ‘पॉवर सेंटर’ तयार होत असल्याची चर्चा अधिक जोर धरत आहे.
या सगळ्यात दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना कथितरित्या ‘नो एन्ट्री’ देण्यात आल्याच्या बातमीने राजकीय भूकंप घडवला. जरी दोन्ही बाजूंनी या वृत्ताचा इन्कार करण्यात आला असला तरी “धूर आहे म्हणजे आग कुठेतरी लागलेली असते,” अशी प्रतिक्रिया राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
या वादामागे दोन कथित कारणांची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिलं कारण म्हणजे एक कथित ऑडिओ क्लिप. या क्लिपमध्ये नव्या नेतृत्वाबद्दल आक्षेपार्ह चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार आणि जय पवार यांच्याबद्दल कथित अवमानकारक वक्तव्ये करण्यात आली असून ती क्लिप थेट नव्या नेतृत्वापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
दुसरं कारण म्हणजे पक्षाच्या आर्थिक व्यवहारांबाबतचे आरोप. एका महिला नेत्या संबंधित ब्युटी पार्लरचं बिल, काही नेत्यांच्या खासगी हेलिकॉप्टर प्रवासाचा खर्च, तसेच पंचतारांकित हॉटेलमधील खर्च पक्षाच्या निधीतून करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
मात्र या सर्व घडामोडींमधून एक संदेश स्पष्ट दिला जात असल्याचं बोललं जात आहे — पक्षात आता फक्त नेतृत्व बदलत नाही, तर मोठं ‘क्लिनअप ऑपरेशन’ सुरू आहे.