रोहा (प्रतिनिधी) : रोहा शहरातील कुंडलिका नदीत सोमवारी दुपारच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भरतीच्या पाण्यावर एक व्यक्ती तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. 18 मे रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान कुंडलिका नदीत एक इसम पाण्यावर तरंगताना दिसून आला. नागरिकांनी तात्काळ याची माहिती रोहा पोलीस स्टेशन येथे दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पाण्यात तरंगत असलेली बॉडी अष्टमी नदी किनाऱ्यापर्यंत आणली. मृत इसमाचे वय अंदाजे 45 ते 46 वर्षे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, संबंधित इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार सुनील शिरसाट, मेजर शरद कोटकर तसेच याकुब तडवी करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.





