अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरातील नागरिकांसाठी बहुप्रतिक्षित क्रीडा संकुलाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असून, लवकरच शहरवासीयांना अत्याधुनिक आणि सुसज्ज सुविधांनी युक्त क्रीडा संकुलाचा लाभ घेता येणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला अखेर गती मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हे क्रीडा संकुल आधुनिक सुविधा, दर्जेदार बांधकाम आणि विविध खेळांसाठी आवश्यक सोयींनी सज्ज असणार आहे. येथे युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या क्रीडा संकुलामध्ये इनडोअर आणि आऊटडोअर खेळांसाठी स्वतंत्र व्यवस्था, व्यायाम सुविधा, प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना अलिबाग नगरपरिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी सांगितले की, “क्रीडा संकुलाच्या उभारणीला काही प्रमाणात उशीर झाला असला तरी आता अलिबागकरांसाठी सुसज्ज आणि अत्याधुनिक पद्धतीचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. शहरातील नागरिकांना माफक दरात येथील सुविधांचा लाभ घेता येईल.”
या प्रकल्पामुळे अलिबागमधील क्रीडा संस्कृतीला चालना मिळण्यास मदत होणार असून, स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सुविधा आपल्या शहरातच उपलब्ध होणार आहेत. तसेच भविष्यात विविध क्रीडा स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यासाठीही हे संकुल महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






