जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरसीएफकडून अलिबाग परिसरात बाटली संकलन बिन्सचे वितरण


अलिबाग(प्रतिनिधी): प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालून समुद्रकिनारे व सार्वजनिक परिसर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अलिबाग तालुक्यात चार मोठ्या आकाराच्या बाटली संकलन बिन्स (बॉटल बिन्स) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमांतर्गत किहीम, नागाव आणि वरसोली या प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर प्रत्येकी एक तसेच अलिबाग शहरातील एस.टी. बसस्थानक परिसरात एक अशा एकूण चार बाटली संकलन बिन्सचे वितरण करण्यात आले आहे. पर्यटनस्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा साचत असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत असून सागरी जीवसृष्टीलाही धोका निर्माण होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन आरसीएफने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे.
आरसीएफकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या बिन्समधील प्लास्टिक कचऱ्याचे नियमित संकलन व योग्य व्यवस्थापन संबंधित ग्रामपंचायती तसेच अलिबाग नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे आरसीएफ, ग्रामपंचायती आणि नगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून परिसरातील स्वच्छता राखण्यास तसेच प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता उपलब्ध करून दिलेल्या बाटली संकलन बिन्समध्ये जमा करावा, असे आवाहन आरसीएफच्या वतीने करण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक प्रशासनाकडून स्वागत करण्यात येत असून स्वच्छ व हरित पर्यावरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.