नवीन ११ वर्गखोल्यांचे डॉक्टर गौतम दप्तरी व मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील चिखली येथील सरखेल कान्होजी आंग्रे माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन सोमवारी मोठया उत्साही वातावरणात झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी हा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि शाळा समितीचे अध्यक्ष राजा केणी, सिरो क्लिनफार्म प्रायव्हेट लिमीटेडचे चेअरमन डॉ. गौतम दफ्तरी, श्रीमती आरती दफ्तरी, रायगड जिल्हा परीषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी, जेएसडब्ल्यू कंपनीचे सामाजिक दायित्व विभागाचे प्रमुख सुधीर तेलंग ,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे निरीक्षक एस. सी. महाजन आदि उपस्थित होते. सिरो क्लिनफार्मचे डॉ. गौतम दफ्तरी यांनी या इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास एक कोटी रूपये उपलब्ध करून दिले. त्यातून पुरेशा वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वाचनालय, स्वयंपाक घर, सभागृह उभारण्यात आले आहे. याबद्दल राजा केणी यांनी डॉ. गौतम दफ्तरी यांचे मनापासून आभार मानले आणि यापुढेही सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. भविष्यात याच शाळेत महाविद्यालयाचे वर्ग सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
एक चांगलं काम आपल्या हातून घडल्याचे सांगत डॉ. गौतम दफ्तरी यांनी समाधान व्यक्त केलं. शाळेने आणि ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमामुळे आपण भारावून गेल्याचे सांगत ग्रामीण भागातील मुले शिकावीत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेची जुनी इमारत मोडकळीस आली असून धोकादायक बनली आहे. अशावेळी डॉ. गौतम दफ्तरी हे देवासारखे धावून आले असे सांगत विद्यार्थी आणि पालकांनी दफ्तरी यांना धन्यवाद दिले. जेएसडब्ल्यू कंपनीचे सामाजिक दायित्व विभागाचे प्रमुख सुधीर तेलंग यांनी या परीसरातील शाळा सुसज्ज आणि आधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न असून काही शाळा आयएसओ मानांकन प्राप्त कशा होतील याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले.
यावेळी रायगड जिल्हा परीषद महिला बालकल्याण समिती सभापती रसिका केणी, शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख संजीवनी नाईक, मीता शाह, गिरीश मुजूमदार, उमा मुजूमदार, जीवन पाटील यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. जीवीता पाटील यांन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.






