कळंबोलीत फुटपाथवरील पादचाऱ्यांना चिरडत केले अनेक वाहनांचे नुकसान


नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबईतील कळंबोली परिसरात सोमवारी दिनांक १५ जूनच्या सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने आलेल्या एका कारने फुटपाथवरून चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे  कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट फुटपाथवर चढले आणि तेथे चालत असलेल्या नागरिकांना धडक दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त कार कळंबोली येथील सत्यम हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय बारणवाल चालवत होते. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले किंवा अन्य कोणते तांत्रिक कारण होते का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून वाहनाचा वेग, चालकाची स्थिती आणि अपघातामागील नेमकी कारणे यांचा सखोल तपास सुरू आहे.