अलिबाग-रोहा मार्गावर भीषण अपघात; १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, चालक गंभीर जखमी


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोली गावाजवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इश्वर पवार हा त्याची मैत्रीण रुशाली अंकुश वाघमारे (वय १८) हिला दुचाकीवरून अलिबाग-रोहा मार्गाने घेऊन जात होता. सुडकोली गावाच्या हद्दीतील तीव्र वळणाजवळ आल्यानंतर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या खाली असलेल्या ओढ्यात कोसळली.
अपघाताचा जोर इतका प्रचंड होता की मागे बसलेल्या रुशाली वाघमारे हिच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर चालक इश्वर पवार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्याने जखमीला बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तसेच अपघातग्रस्त दुचाकी बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न करावे लागले.
या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित शिवाजीराव गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोली परिसरातील धोकादायक वळणांवर वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी संरक्षण कठडे, इशारा फलक, वेगमर्यादा दर्शविणारी चिन्हे, रस्त्यावर परावर्तित मार्किंग तसेच अन्य आवश्यक सुरक्षितता उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.