रायगड (प्रतिनिधी): देहेन-भाकरवड या गावाला जोडणारा अपूर्ण पुल, वाहून गेलेल्या तात्पुरत्या बंधाऱ्यामुळे गावांचा संपर्क तुटला होता. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत पाच दिवसात पर्यायी पुलाची व्यवस्था करा अन्यथा शेकाप स्टाईलने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. असा इशारा दिला होता. अखेर चित्रलेखा पाटील यांच्या मागणीची दखल घेत देहेन येथील पर्यायी पुलाचे काम बांधकाम विभागामार्फत करण्यात आले. चित्रलेखा पाटील यांच्यामुळे देहेन आणि भाकरवड गावांतील नागरिक, विद्यार्थी, महिलांना पुलाचा आधार मिळाला.
देहेन- भाकरवड हा पुल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत आहे. या गावाला जोडणारा पुल शासनाच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती प्राप्त झाली. या पुलाचे काम सप्टेंबरपासून सूरू झाले मात्र पर्यायी वहिवाटीसाठी पर्यायी बंधारा तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आला होता. पावसाळा सुरु झाला तरी पुलाचे काम झाले नाही. मंगळवारी (दि.23) पावसाने सुरुवात केली. पहिल्याच पावसात
पर्यायी बंधारा वाहून गेला. पुलाचे अपूर्ण काम, तात्परुत्या स्वरुपात बांधलेला वाहून गेलेला बंधारा अशा समस्यांमुळे शाळकरी मुलांसह वयोवृध्द नागरिक, महिलांचे प्रचंड हाल झाले. दोन्ही गावांचा संपर्क तुटल्याचा त्रास नागरिकांना झाला. ही बाब शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी गुरुवारी(दि.25) सकाळी घटनास्थळी धाव घेतली. तेथील ग्रामस्थ, महिलांना भेटून त्यांच्यासोबत संवाद साधला त्यांची समस्या जाणून घेतली. त्यानंतर सुरु असलेल्या पुलाच्या कामाची माहिती घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पाच दिवसांत पर्यायी पुल तयार करून दिला नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल अशा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला. अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले. त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात पुलाचे बांधकाम केले आहे. त्यामुळे हा पुल आता वहिवाटीसाठी सुरू करण्यात आला आहे. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने देहेन- भाकरवडमधील ग्रामस्थांचा मार्ग मोकळा झाला.





