धोकवडेतील शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात काँग्रेसचे निवेदन


अलिबाग  (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावातील शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या ताब्यात असलेल्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरून नावे बेकायदेशीरपणे कमी केल्याचा आरोप करत काँग्रेसने तहसीलदार विक्रम पाटील यांना निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मधुकर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष सुनील थळे, नगरसेवक समीर ठाकूर व ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेऊन निषेध नोंदविला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मौजे धोकवडे येथील गट क्रमांक ७७६/११, ७७६/१३ व ७९४/२ मधील शेतकऱ्यांची नावे फेरफार क्र. २७४१ अंतर्गत कोणतीही नोटीस न देता गाव नमुना ६ मधून कमी करण्यात आली. ग्राम महसूल अधिकारी सरफराज दफेकर व मंडळ अधिकारी नलिनी पाटील यांनी कथितपणे ‘पिपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या हितासाठी हा फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच न्यायालयीन आदेशांचा चुकीचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा दावाही करण्यात आला.
राजाभाऊ ठाकूर यांनी, “शेतकऱ्यांची एक इंचही जमीन बेकायदेशीरपणे हिरावून घेऊ देणार नाही,” असा इशारा दिला. फेरफार रद्द करून नावे पूर्ववत करावीत, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.