रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेने ८१७५ कोटी व्यवसायाचा टप्पा गाठल्याची घोषणा करण्यात आली. तसेच लवकरच १०००० कोटी व्यवसाय आणि १००० कोटी स्वनिधी गाठण्याचा संकल्प व्यक्त करत बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सभासदांना १२.५ टक्के लाभांश जाहीर केला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अलिबाग येथील केंद्र कार्यालयात आयोजित ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक हे उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात नैसर्गिक शेतीकडून शेतकर्यांनी आधुनिक शेतीसाठी वळावे याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी बँकेच्या वतीने “कृषीमित्र” योजना सुरू करण्यात आलेली असून पडीक जमिनीवर बांबू लागवड आणि ड्रॅगन फ्रूट प्रकल्पांसाठी ७ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जाहीर करत रोहा येथील हर्षद साळवी यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीत केलेल्या प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करणारी भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होण्याचा मान रायगड बँकेला मिळाल्याचे नमूद केले. तसेच महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाइन व बायोमेट्रिक पद्धतीने पीक कर्ज वितरण प्रणाली सुरू करण्यात आली असून, ७/१२ ची ऑनलाइन पडताळणी करून पारदर्शक व जलद कर्ज प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी सभेला दिली.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सन २०२५-२६ मधील बँकेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सभेला सादर केला. बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात नेट एनपीए शून्य टक्के राखून ९३.३७ कोटी ढोबळ नफा बँकेने प्राप्त केल्याची माहिती त्यांनी सभागृहास दिली. तसेच त्यांनी बँकेने आर्थिक वर्षात २७ टक्के आपल्या व्यवसायात वाढ केलेली असून याकरिता बँकेच्या ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले.
या सभेत कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक गिरीश तुळपुळे, विद्यमान अध्यक्ष नंदकुमार चाळके आणि संचालक मंडळ तसेच आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील अध्यक्ष अभिजीत पाटील आणि संचालक मंडळ, अधिकारी यांनी १००० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव या सभेत करण्यात आला. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पहिला फ्लाईंग ऑफिसर कौस्तुभ मेहूल पाटील, आदर्श आणि प्रयोगशील शिक्षक राजेश रामचंद्र भोईर (पेण), आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू योगेश पेणकर (महाड), प्रगतशील शेतकरी मनोहर दत्तात्रेय पाटील, मंदार पाटील (अलिबाग), हर्षद साळवी (रोहा), शरीरसौष्ठवपटू प्रणव पुजारी (अलिबाग), कृषिभूषण प्रगतशील शेतकरी दिलीप भाऊ शिंदे (महाड), आरसीएफ एक्स एम्प्लॉयी सोशल फोरम आणि पर्यावरण संवर्धन संस्था ग्रीन अलिबाग यांचा समावेश होता. तसेच बँकेच्या ठेववाढीमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बँकेचे संचालक संतोष पाटील यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.
अहवाल वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेशी संलग्न पेझारी (अलिबाग), पाच्छापूर (पाली), कोप्रोली (पेण), वरंध (महाड), नेरळ (कर्जत) आणि गोसावीबुवा (तळा) या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचाही यावेळी गौरव करण्यात आला. तसेच ३६ वर्षे प्रामाणिक आणि उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी महेंद्र माळी आणि अहवाल सालात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवीन पनवेल शाखेच्या शाखाधिकारी निशा घरत यांचाही सभेत सन्मान करण्यात आला. सभेला सभासद, अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






