
अलिबाग (प्रतिनिधी): को. ए. सो. जा. र. ह. कन्या शाळा, अलिबाग येथील ज्येष्ठ शिक्षिका स्नेहल सतीश आंब्रे या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी शैक्षणिक सेवेनंतर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाळेत आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. गेल्या तीन दशकांहून अधिक काळात त्यांनी घडविलेल्या असंख्य विद्यार्थिनी, माजी शिक्षिका, सहकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या शिक्षिकेला कृतज्ञतापूर्वक निरोप दिला.
स्नेहल आंब्रे या कन्या शाळेच्या व्यवसाय शिक्षण विभागात अध्यापन करत होत्या. अध्यापनासोबतच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले. शाळेतील नियमित अध्यापनापुरते मर्यादित न राहता उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना त्या स्वतःच्या घरी निशुल्क मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या अनेक विद्यार्थिनी आज विविध उच्च पदांवर कार्यरत असून, त्या अनेक विद्यार्थिनींसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
उत्कृष्ट निवेदिका म्हणून अलिबाग परिसरात त्यांची स्वतंत्र ओळख आहे. महिला जनजागृतीपर व्याख्यानांमधून त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले. तसेच अलिबाग पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीवर सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. अंबिका योग कुटीर आणि पतंजली योगपीठाच्या माध्यमातून त्यांनी योग प्रशिक्षण देत आरोग्यविषयक जनजागृतीचेही कार्य केले.
निरोप समारंभासाठी विद्यार्थिनींनी संपूर्ण शाळा फुगे, फुले आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजवली होती. शाळेत येणाऱ्या प्रत्येक माजी विद्यार्थिनीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अनेक माजी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत आंब्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाच्या, प्रेमळ स्वभावाच्या आणि शाळेतील अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. आपल्या आवडत्या शिक्षिकेला निरोप देताना अनेक विद्यार्थिनी भावूक झाल्या.
यावेळी स्नेहल आंब्रे यांनी आपल्या मनोगतात शिक्षिका होण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आपल्या आदरणीय दादांना वंदन केले. तसेच को. ए. सो. संस्थेचे ज्येष्ठ संचालक संजयभाई पाटील, नंदाताई देशमुख, वडील दादा मोरे, आई सुनंदा मोरे तसेच गुरू आगलावे सर, खोपकर सर आणि फुलगावकर मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानत आपल्या शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सरला किणी होत्या. कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन प्रा. संतोष माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिल राऊत, प्रा. रवी वागळे, प्रा. सुनंदा आंब्राळे, माजी विद्यार्थिनी प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्त्या तपस्वी गोंधळी तसेच अनेक माजी विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा शेडगे यांनी केले, तर आभारप्रदर्शन स्टाफ सेक्रेटरी प्रा. शशी सिरसट यांनी केले.
शाळेतील निरोप समारंभानंतर माजी विद्यार्थिनी, मान्यवर आणि नागरिकांनी स्नेहल आंब्रे यांची त्यांच्या निवासस्थानापर्यंत सन्मान मिरवणूक काढून त्यांना कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा दिल्या. भावनिक वातावरणात पार पडलेला हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.





