
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील नियोजनावर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह
अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान पत्रकारांसाठी करण्यात आलेल्या आसनव्यवस्थेतील त्रुटींमुळे पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पत्रकार कक्षात पुरेशी आसनव्यवस्था उपलब्ध नसल्याने काही पत्रकारांना सभागृहाबाहेर जावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पत्रकारांसाठी राखीव असलेल्या जागांवर काही लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते, चालक तसेच इतर अनधिकृत व्यक्ती बसल्याचे दिसून आल्याने सभेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सभेदरम्यान मुरुड पंचायत समितीचे सभापती निलेश घाटवळ हे मुरुड पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी पाटील यांना शेजारी बसवून सभेला उपस्थित असल्याची चर्चा सभागृहात रंगली. तसेच पंचायत समितीच्या कक्षात काही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे सहाय्यक बसल्याचेही दिसून आले. त्यामुळे अधिकृत कामकाजासाठी राखीव असलेल्या जागांचा वापर आणि सभेतील शिस्त याबाबत उपस्थितांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.
बसण्याच्या व्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमित नाईक यांनीही सभाध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली. याचदरम्यान एका ज्येष्ठ महिला पत्रकारांसोबतही आसनव्यवस्थेवरून वाद झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसारख्या महत्त्वाच्या बैठकीत पत्रकार हे प्रशासन आणि जनतेदरम्यानचा महत्त्वाचा दुवा मानले जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र, पुरेशी आणि सुसूत्र आसनव्यवस्था उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना नियोजनातील त्रुटी स्पष्टपणे जाणवल्याची प्रतिक्रिया पत्रकारांनी व्यक्त केली.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पत्रकार, अधिकारी आणि अधिकृत निमंत्रित यांच्यासाठी स्वतंत्र व नियोजनबद्ध आसनव्यवस्था करण्यात यावी. तसेच सभागृहात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश किंवा राखीव जागांवर बसण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात येत आहे.





