अलिबागच्या कु. विरा नरबेकरची एकपात्री स्पर्धेत बाजी; अंतिम फेरीत धडक


अलिबाग  (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न बालरंगभूमी परिषद आयोजित “इतिहास महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत झालेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांच्या जीवनकार्यावरील एकपात्री अभिनय स्पर्धेत अलिबाग येथील कु. विरा प्रशांत नरबेकर हिने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. अंतिम फेरी ९ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे होणार आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवारी (१ ऑगस्ट) ऐरोली येथील न्यू युरो स्कूलच्या सुसज्ज रंगमंचावर पार पडली. एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नृत्य आणि विविध कलाप्रकारांचा समावेश असलेल्या या महोत्सवात बालकलाकारांना मोठ्या व्यासपीठावर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाला बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के-सामंत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष विजय चौगुले, बालरंगभूमी परिषद नवी मुंबईचे अध्यक्ष शुभम चौगुले, कार्याध्यक्ष प्रवीण जगन्नाथ, उपाध्यक्ष बाळकृष्ण ओडेकर, राजश्री जगताप, उत्कर्षा पाटील तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. लता पाडेकर आणि कल्पना गोसावी यांनी केले, तर सूत्रसंचालन लेखक, दिग्दर्शक व अभिनेते रवी वाडकर यांनी केले. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन, बालकलाकारांसाठी करण्यात आलेले आदरातिथ्य आणि सर्वांगीण व्यवस्था याबद्दल पालकांनी व स्पर्धकांनी आयोजकांचे कौतुक केले.
स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल कु. विरा नरबेकर हिचे उपस्थित मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले. अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के-सामंत यांनीही तिच्या अभिनयाचे कौतुक करत अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.