संघटन मजबूत, कार्यकर्ता सक्षम आणि विजयाचा संकल्प


भाजप महिला मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा; आगामी कार्यक्रमांसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

रायगड (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने जिल्हा कार्यकारिणी तसेच महिला मोर्चाच्या मंडळ कार्यकारिणीतील कार्यकर्त्यांच्या यादीचा आढावा घेण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा मा. चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.

यावेळी जिल्ह्यातील पक्ष संघटनेची सद्यस्थिती, महिला मोर्चाची कार्यपद्धती तसेच मंडळनिहाय संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम, संघटन विस्तार आणि महिला मोर्चाची भूमिका याबाबत प्रदेश नेतृत्वाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

महिला मोर्चाच्या माध्यमातून महिलांपर्यंत पक्षाची भूमिका आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासोबतच अधिकाधिक महिलांना संघटनेशी जोडण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बूथ स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहनही करण्यात आले.

या बैठकीतून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची आणि ऊर्जेची भावना निर्माण झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनातून मिळालेली दिशा घेऊन रायगड जिल्ह्यात भाजप महिला मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. चित्राताई पाटील यांनी सांगितले.

आगामी काळात संघटन विस्ताराला गती देऊन पक्षाच्या विचारधारेसोबत अधिकाधिक महिलांना जोडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. “संघटन मजबूत, कार्यकर्ता सक्षम आणि विजयाचा संकल्प” या भूमिकेतून महिला मोर्चा प्रभावीपणे काम करणार असल्याचेही डॉ. चित्राताई पाटील यांनी स्पष्ट केले.