बालकांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी; अलिबाग नगरपरिषदेच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


२५० बालकांची आरोग्य तपासणी; ज्येष्ठ नागरिकांनाही मोफत वैद्यकीय सेवा व औषधांचा लाभ

अलिबाग(प्रतिनिधी) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अलिबाग नगरपरिषद आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बालक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सुमारे २५० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनीही वैद्यकीय तपासणी करून घेतली.

शिबिराला मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ नागरिकांची तपासणी डॉ. वैभव चउलकर, डॉ. अपूर्वा पाटील, डॉ. सचिन जायभाये आणि डॉ. मंजिरी इंगळे यांनी केली. तसेच बालकांची तपासणी डॉ. सागर खेदू, डॉ. मैत्रयी तिवारी, डॉ. सरोदे, डॉ. मनोज कोळी आणि डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन केले.

या आरोग्य शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मेडिकल डिस्ट्रिब्युटर असोसिएशनच्या वतीने आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे डॉक्टरांच्या तपासणीनंतर आवश्यकतेनुसार बालक आणि ज्येष्ठ नागरिकांना औषधेही उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

अलिबागच्या उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती ॲड. मानसी म्हात्रे यांनी शिबिराच्या विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी बालकांची तसेच ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली. तसेच वैद्यकीय पथक व नगरपरिषद कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शिबिराच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी नगरसेविका शैला भगत, स्वीकृत नगरसेवक जमाल सय्यद, आरोग्य विभाग प्रमुख प्रियांका मोरे, नगर अभियंता संतोष मुंढे, स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, शहर समन्वयक आर्या जाधव, मुकादम प्रकाश तांबे आणि अक्षय गायकवाड यांच्यासह अलिबाग नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांना त्यांच्या परिसरातच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेकडून विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बालक आणि ज्येष्ठ नागरिक हे आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याची गरज असलेले घटक असल्याने अशा शिबिरांमधून त्यांची नियमित तपासणी होण्यास मदत होते. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत यापुढेही विविध आरोग्यविषयक उपक्रम आणि तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.