पटियाला (प्रतिनिधी) : पंजाबच्या पटियाला शहरात घर पाहण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर पिटबुल कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी घर पाहण्यासाठी गेले असताना अचानक पिटबुलने महिलेवर झडप घातली. कुत्र्याने महिलेला चावा घेतल्यानंतर तिला वाचवण्यासाठी तिचा पती धावून आला. मात्र, पिटबुलने त्याच्यावरही हल्ला करत त्याला चावा घेतला.
विशेष म्हणजे, तब्बल १ मिनिट १५ सेकंदांपर्यंत पिटबुलचा हा हल्ला सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी कुत्र्याला पती-पत्नीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिटबुल वारंवार दोघांवर झडप घेत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाल्याची माहिती असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिटबुलसारख्या आक्रमक कुत्र्यांच्या पालनाबाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, नागरिकांकडून पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेबाबत आणि त्यांच्या नियंत्रणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.









