पंचनदी येथे ‘कृषिकन्या’ गटातर्फे शेतकरी सत्कार, रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धा उत्साहात


लोणावळा (श्रावणी कामत): दापोली:डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमाच्या ‘कृषिकन्या’ विद्यार्थीनी गटातर्फे निर्मळ ग्रुप ग्रामपंचायत, पंचनदी कार्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकरी सत्कार समारंभ, रानभाज्यांचे प्रदर्शन आणि रानभाज्यांवर आधारित पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली.
​कार्यक्रमाला पंचनदी गावच्या सरपंच सौ. संकल्पा शिंदे, उपसरपंच अमित नाचरे आणि प्रगतशील शेतकरी धनंजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून या प्रसंगी परिसरातील निवडक शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
​रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी महत्त्व आणि दैनंदिन आहारातील उपयोग याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक रानभाज्यांपासून महिलांनी अत्यंत पौष्टिक व नाविन्यपूर्ण पदार्थ तयार केले होते. यासोबतच विविध रानभाज्यांच्या नमुन्यांचे प्रदर्शन भरवून उपस्थितांना त्या भाज्यांबद्दल माहिती देण्यात आली. शेतकरी सन्मान, रानभाज्यांचे संवर्धन, महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन आणि स्थानिक उत्पादनांना चालना देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
​मार्गदर्शन आणि परिश्रम
​या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. डी. शिर्के, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, डॉ. थोरात, डॉ. शिगवण, डॉ. राऊत, डॉ. दोसाणी, डॉ. तोरणे व डॉ. गुढदे यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.
​कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिकन्या गटातील विद्यार्थीनी श्रेया कर्पे, उन्नती धोडी, निशा घोरपडे, स्वप्नाली जाधव, कोमल कडू, गायत्री कुंभार, रसिका मासये, समृद्धी आंबेकर, आदिती आंब्रे, श्रुती गोरीवले, सानिया राहटे, प्राची येलवे आणि सोनाली खर्चे यांनी विशेष मेहनत घेतली.