अलिबाग (प्रतिनिधी): नागाव-बदामी बीच येथील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायत नागावच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले असून, आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत नागावच्या सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका काठे, शांभवी म्हात्रे, परेश ठाकूर, वीणा पिंपळे तसेच ग्रामस्थांमधून मनोहर ठाकूर, पद्माकर गुरव, राजेंद्र ठाकूर, अरुण गुरव, अनिल मानकर, अक्षय मानकर ,अभिषेक नाईक, शुभम गुरव आदी मान्यवर व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
सुमारे २५० ते ३०० मीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी पंधराव्या वित्त आयोगातून १.५० लाख रुपये, तर ग्रामपंचायत स्वनिधीतून ५ लाख रुपये, असा एकूण ६.५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
बदामी बीचकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असून, काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांचीही मोठी सोय होणार आहे. रस्त्याची वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होण्यासही मदत होणार आहे.
या कामासाठी सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक निधीची उपलब्धता व कामाची कार्यवाही पूर्ण करून घेतली. ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत रस्ते व पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावण्यावर त्यांचा विशेष भर आहे.









