पिंपरी-चिंचवड (श्रावणी कामत): शहरातील विविध विकासकामांसाठी प्रलंबित असलेली भूसंपादनाची प्रकरणे पुढील दीड महिन्यात निकाली काढावीत, असा अल्टिमेटम भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. अन्यथा आगामी अधिवेशनात संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी १०० टक्के भूसंपादन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणाला गती मिळण्याची शक्यता आहे.
भूसंपादन प्रस्तावांवर विभागनिहाय जबाबदारी निश्चित करून १५ दिवसांत मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रलंबित प्रकरणांचा दर आठवड्याला आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. भूसंपादन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही आमदार लांडगे यांनी केली असून, प्रशासकीय दिरंगाईमुळे विकासकामे रखडू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.









