रायगडातील महिलांनी साकारले गणरायाचे मोहक रूप बचतगटांकडून 1 लाख 53 हजार 541 गणपतीमूर्ती तयार


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढकारातून उमेद अभियानांतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात महिलांनी पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे 247 बचतगटातील महिलांनी 1 लाख 53 हजार 541 गणपतीमूर्ती तयार केल्या आहेत. बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याने, जिल्ह्यातील महिला शक्ती गणपती मूर्ती व्यवसायात गरुडझेप घेणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश, विदेशात मोठी मागणी आहे. सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, रेखीव डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना खास ओळख प्राप्त झाली असून, गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या व्यवसायात पेण तालुक्यातील महिला बचतगट उतरले आहेत.
या व्यवसायासाठी उमेद अभियानामार्फत महिला बचतगटांना फिरता निधी तसेच ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला आहे. यामुळे महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे. या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्या अधिक सक्षम बनल्या आहेत. त्यामुळेच जास्तीत जास्त महिलांनी या व्यवसायात सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. त्या माध्यमातून उपजीविकेच्या नवनवीन संधी निर्माण होऊन महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करता येणार आहे.

2 हजार 250 मूर्तींची परदेशवारी:
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील सुमारे 247 बचत गटातील महिला या गणपती व्यवसायात सहभागी झाल्या आहेत. महिला बचत गटांनी 1 लाख 53 हजार 541 गणपतीमूर्ती तयार‌ केल्या असून, यामधील 2 हजार 250 गणपती मूर्ती परदेशात पाठविण्यात येणार आहेत.

तालुका तयार केलेल्या मूर्तीची संख्या
अलिबाग 328
कर्जत 614
खालापूर 950
महाड 70
माणगाव 2125
मुरुड 2210
पनवेल 180
पेण 145284
रोहा 195
श्रीवर्धन 240
सुधागड 600
तळा 150
उरण 695
एकूण 153541