अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील वाढती पाणीटंचाई आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता सांबरकुंड धरण प्रकल्प काळाची गरज आहे. या प्रकल्पामुळे सिंचनासह नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मात्र, धरण उभारताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांकडेही शासनाने गांभीर्याने पाहून त्यांचे समाधान करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलिबाग येथील ताज रिसॉर्टमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार तटकरे यांनी सांबरकुंड धरणासह पेट्रोलियम व नॅचरल गॅस समितीच्या कामकाजातील विविध प्रश्न, स्थानिकांच्या समस्या तसेच मेडिकल महाविद्यालयाच्या विषयावर भाष्य केले. सांबरकुंड धरण प्रकल्पातून शासनाला थेट आर्थिक उत्पन्न मिळणार नसले, तरी अलिबाग तालुक्याच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व मोठे आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ओएनजीसी आणि गेल कंपनीचा पाहणी दौरा करण्यात आला. या दौऱ्यात विविध बाबींची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. समितीमार्फत या पाहणीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असून, तो केंद्र सरकार तसेच राज्यसभेकडे सादर केला जाईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली.
स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य प्रतोद अमित नाईक, आशिष भट, ॲड. विलास नाईक आणि चारुहास मगर उपस्थित होते.









