उबाठा शिवसेनेची आज अलिबाग शहर पदाधिकारी व शिवसैनिक आढावा बैठक


अलिबाग(प्रतिनिधी) : अलिबाग शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या (उबाठा) पदाधिकारी व शिवसैनिकांची आढावा बैठक आज, रविवारी आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक वाटचाल, शहरातील राजकीय परिस्थिती तसेच विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ही बैठक दुपारी ठीक ४ वाजता चेढरे बायपास रोड, फुटाणे हॉस्पिटलसमोर, अलिबाग येथे होणार आहे. अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. संदीप पालकर यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

बैठकीत अलिबाग शहरातील पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच पदाधिकारी व शिवसैनिकांच्या अडचणी, नागरिकांचे स्थानिक प्रश्न, आगामी उपक्रम आणि पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी तसेच शिवसैनिकांमध्ये समन्वय वाढविण्याबाबतही चर्चा होणार आहे.

या आढावा बैठकीस अलिबाग शहरातील उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ॲड. संदीप पालकर यांनी केले आहे.