राजिप कृषि विभागाकडून प्रयोगशील शेतक-यांचा सन्मान


अलिबाग(प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाकडून जिल्ह्यातील प्रयोगशील शेतक-यांचा सन्मान सोहळा सोमवारी (ता.24) आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकूण 36 शेतक-यांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल व 14 प्रगतशील शेतकरी यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषि व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रूपाली सातपुते, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वारगुडा, सदस्या ज्योती नागावकर, सदस्या नलिनी लोखंडे, पंचायत समिती सभापती माणगाव विलास शिंदे, जिल्हा कृषि अधीक्षक वंदना शिंदे, कृषि विकास अधिकारी पवनकुमार नजन, पुरस्कारप्राप्त शेतकरी, इतर अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
कृषि विकास अधिकारी पवनकुमार नजन यांनी प्रथम कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण योजनेची सविस्तर माहिती देउन या योजनेचा लाभ महिला शेतक-यांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी मार्गदर्शन करताना, शेतक-यांमुळेच आज आपण सुखाने दोन घास खाऊ शकत आहोत. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने शेतक-यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे.. या योजना प्रत्येक शेतक-यापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न आमचा प्रयत्न आहे. सध्याच्या काळात शेतक-यांनीही आधुनिकतेसह सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी जे सहकार्य लागेल ते रायगड जिल्हा परिषदेकडून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले की, आपला रायगड जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा आहे. त्यामुळे येथील शेतक-यांना समृद्ध करण्यासाठीचे सर्वत्र प्रयत्न रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र व राज्य शासनाचेही सहकार्य आपल्याला लाभत आहे. शेतीला पूरक असणा-या व्यवसायांसाठी शेतकर्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. येत्या काळात 12 ते 15 हजार शेतक-यांना मिनी भाजीपाला किट देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागानेही पशुधन विमा योजना सुरू केली आहे. त्यामुळे या सर्व योजनांचा लाभ शेतक-यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार डाॅ. रूपाली सातपुते यांनी, रायगडातील शेतकरी प्रयोगशील असल्याने आता विविध पिके वाढत आहेत. शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. रायगडातील पारंपरिक तांदूळ, आंबा पिकासह भाजीपालाख् कलिंगडासारखे पिकेही शेतकरी घेत आहेत. त्यामुळे इतर शेतक-यांनीही आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करावेत. तसेच जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी एकूण 36 पुरस्कार प्राप्त व 14 प्रगतशील शेतक-यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये उद्यान पंडित पुरस्कार, शेतीनिष्ठ पुरस्कार, संेद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कारांचे वितरण करून शेतक-यांना सन्मानित करण्यात आले. शेवटी मोहीम अधिकारी महेश नारायणकर यांनी नव्याने सुरू झालेल्या एफएफएस अॅप प्रणालीबाबत मार्गदर्शन केले.

**********
केंद्र शासनाच्या कृषि विभागाकडून रायगड जिल्हयामध्ये खत खरेदी व विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. जिल्हयातील शेतक-यांना खताचा साठा उपलब्ध आहे की, नाही याची खातरजमा करण्यासाठी कृषी केंद्रावर फे-या माराव्या लागत होत्या. त्यामुळे शेतक-यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जायचे. आता शेतक-यांना आपल्या मोबाइल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून घरी बसून स्वतः च्या आवश्यकतेप्रमाणे व हव्या त्या खत विक्रेत्याकडून युरिया सुफला डीएपी व इतर अनुदानित खताची खरेदी करता येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.