अलिबाग (प्रतिनिधी) : लायन्स क्लब ऑफ अलिबाग मांडवा परिवारासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, क्लबचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक यांना मॉरिशस येथे आयोजित प्रतिष्ठित ‘लोकमत ग्लोबल चेंज मेकर अवॉर्ड २०२६’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजहित, जनसेवा आणि विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अमित नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. जनतेच्या विविध प्रश्नांवर काम करताना समाजातील गरजू घटकांना मदत, विकासाच्या उपक्रमांना चालना तसेच सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेत त्यांना गौरविण्यात आल्याने अलिबागसह रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मॉरिशस येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात अमित नाईक यांचा सन्मान करण्यात आला. समाजासाठी निष्ठेने आणि समर्पणाने काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याची पोचपावती नसून, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
अमित नाईक यांना मिळालेल्या या सन्मानामुळे लायन्स क्लब ऑफ अलिबाग मांडवा परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याने क्लबच्या सामाजिक उपक्रमांनाही नवी प्रेरणा मिळणार असल्याचे पदाधिकारी व सदस्यांनी सांगितले.
“हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव तर आहेच; मात्र समाजासाठी अधिक निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा सन्मान आहे,” अशी भावना लायन्स क्लब ऑफ अलिबाग मांडवा परिवाराने व्यक्त केली.
अमित नाईक यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लायन्स क्लब ऑफ अलिबाग मांडवा परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याला भविष्यातही नवी ऊर्जा मिळावी, समाजसेवेची वाटचाल अधिक व्यापक व्हावी आणि त्यांच्या हातून अनेक प्रेरणादायी उपक्रम घडावेत, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.









