खासदार सुनील तटकरे यांना शिंदे सेनेचा मोठा धक्का; रोह्यात राष्ट्रवादीला खिंडार


माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांचा राष्ट्रवादीला रामराम; पालकमंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश

रोहा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहा शहरातच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. रोहा शहराचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले आणि अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोटफोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे रोह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

संतोष पोटफोडे यांचे खासदार सुनील तटकरे यांच्याशी दीर्घकाळापासून राजकीय तसेच कौटुंबिक सलोख्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पोटफोडे यांनी घेतलेला राजकीय निर्णय हा तटकरे यांच्या राष्ट्रवादीसाठी धक्कादायक मानला जात आहे. रोहा शहरातील स्थानिक राजकारणात पोटफोडे यांचा असलेला प्रभाव लक्षात घेता त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रोह्यात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात पालकमंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी रोहा शहरासह परिसरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे शिंदेसेनेची रोह्यातील संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

रोहा हा खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय प्रभावाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. अशा परिस्थितीत माजी नगराध्यक्षांसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिंदेसेनेत प्रवेश झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोर स्थानिक पातळीवर संघटन मजबूत ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यातील आगामी राजकीय संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच शिंदेसेनेने केलेली ही राजकीय मुसंडी आगामी निवडणुकांमध्ये कितपत प्रभावी ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.