मापगाव परिसरात ५० वर्षीय इसमाची हत्या; जेसीबीच्या धडकेत मृत्यू


मारेकरी फरार; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू, परिसरात खळबळ

अलिबाग  (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील मापगाव परिसरात एका ५० वर्षीय इसमाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. टाकादेवी मंदिराजवळील दगडाच्या खाण परिसरात जेसीबीच्या सहाय्याने धडक देऊन संबंधित इसमाला गंभीर जखमी करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मापगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विजय थळे (बाबू) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील थळे यांचे धाकटे बंधू होते.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मापगाव परिसरातील टाकादेवी मंदिरानजीक असलेल्या दगडाच्या खाणीजवळ विजय थळे यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने धडक देण्यात आली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीच्या माहितीनुसार, हा प्रकार घडल्याचे समोर आले असून ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून उपलब्ध पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास केला जात आहे.

दरम्यान, विजय थळे यांच्या मृत्यूची बातमी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून घटनेमागील नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विजय थळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलिसांकडून सुरू आहे.