नाशिक (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी नाशिक येथे आयोजित नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दक्षिण रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ मधुकर ठाकूर यांच्या कुटुंबीयांची विशेष भेट घेतली. काँग्रेससाठी अनेक वर्षे योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या भावना आणि अनुभव जाणून घेतले.
या भेटीत समीर ऊर्फ हुनी ठाकूर, सम्राट राजेंद्र ठाकूर, संजुक्ता संजय अनुभवणे, मीनाक्षी मधुकर ठाकूर, प्राची राजेंद्र ठाकूर आणि कुबेर रविंद्र ठाकूर यांच्याशी राहुल गांधी यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी राजाभाऊ ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या राजकीय प्रवासामागे त्यांच्या कुटुंबीयांचाही मोठा त्याग असतो. त्यामुळे त्यांच्या योगदानाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून ही भेट घेतल्याचे सांगण्यात आले. राहुल गांधी यांनी कुटुंबातील तरुण सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा, प्रश्न आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीबाबतची मते जाणून घेतली.
विशेषतः ‘जनरेशन झेड’च्या विचारांना त्यांनी महत्त्व दिल्याची प्रतिक्रिया कुटुंबीयांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांच्या साधेपणाने आणि आपुलकीच्या संवादाने ठाकूर कुटुंबीय सुखावले. ही भेट दक्षिण रायगड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठीही विशेष ठरली असून, कार्यकर्ता आणि त्याच्या कुटुंबाचा सन्मान करण्याचा संदेश यातून मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.









