गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्षया नाईक, प्रशांत नाईक यांच्याकडून समुद्रकिनारी सुविधांची पाहणी; प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणानंतर नागरिक आणि पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या विस्तृत सिमेंट काँक्रीटच्या प्लॅटफॉर्मवर काही उत्साही दुचाकीस्वारांकडून वाहने चालविली जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा तसेच सुशोभीकरणाच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला होता. या बाबीची तातडीने दखल घेत वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी संबंधित यंत्रणेला सूचना देत समुद्रकिनारी लोखंडी बॅरिकेड्स कायमस्वरूपी बसवून घेतले आहेत. त्यामुळे आता हा परिसर दुचाकींच्या वर्दळीपासून सुरक्षित झाला असून नागरिक आणि पर्यटकांना मोकळेपणाने चालता-फिरता येणार आहे.
अलिबाग समुद्रकिनारा हा शहराची ओळख आणि नागरिकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणामुळे या परिसराला अधिक देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर निवांतपणे फेरफटका मारता यावा, कुटुंबासह वेळ घालविता यावा आणि पर्यटकांना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने या परिसरात विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र, नव्याने विकसित करण्यात आलेल्या काँक्रीट प्लॅटफॉर्मवर दुचाकींची ये-जा सुरू असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत होती.
ही बाब लक्षात येताच प्रशांत नाईक यांनी विलंब न करता त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला. प्लॅटफॉर्मवर दुचाकी वाहने येऊ नयेत यासाठी प्रवेशाच्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेला हा परिसर अधिक सुरक्षित झाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि कुटुंबांसह समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना आता कोणत्याही वाहनांच्या अडथळ्याशिवाय मोकळेपणाने फिरता येणार आहे.
‘सुविधा निर्माण करण्याबरोबरच त्यांचा योग्य वापर आणि नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची’, या भूमिकेतून प्रशांत नाईक यांनी घेतलेल्या या तातडीच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. छोट्या वाटणाऱ्या मात्र नागरिकांच्या दैनंदिन वापराशी संबंधित समस्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची कार्यपद्धती यामुळे अधोरेखित झाली आहे. बॅरिकेड्स बसविल्याबद्दल नागरिकांनी प्रशांत नाईक यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
दरम्यान, गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरातील सार्वजनिक ठिकाणे आणि पर्यटकांच्या वर्दळीच्या परिसरातील सुविधांचा आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी अलिबाग समुद्रकिनारी जाणारा रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुविधा तसेच समुद्रकिनारी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली.
गणेशोत्सवाच्या काळात अलिबागमध्ये नागरिकांसह गणेश भक्त आणि पर्यटकांचीही वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांची स्थिती, परिसरातील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, पादचारी सुविधा, समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता तसेच सुशोभीकरण केलेल्या परिसराची देखभाल याबाबत अक्षया नाईक आणि प्रशांत नाईक यांनी संबंधित प्रशासनाकडून माहिती घेतली. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या.
गणेशोत्सवात अलिबागमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित आणि सुस्थितीत असलेले शहर अनुभवता यावे, यासाठी सुविधा आणि व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जात आहे, असा संदेश या पाहणीद्वारे देण्यात आला आहे.
एकीकडे समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने बॅरिकेड्सची उपाययोजना, तर दुसरीकडे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक सूचना या दोन्ही माध्यमातून अक्षया नाईक आणि प्रशांत नाईक यांचा ‘नागरिक सुविधा प्रथम’ हा दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे. याप्रसंगी सभापती अनिल चोपडा नगरसेविका अश्विनी ठोसर नगरसेवक जमाल सय्यद आधी उपस्थित होते.








