ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाचा शुभारंभ; गोविंदा पथकांच्या मानवी मनोऱ्यांनी वेधले लक्ष
अलिबाग (प्रतिनिधी): श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू झाला असून, अलिबाग शहरातही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेकाप पुरस्कृत अभिमानाच्या व मानाच्या दहीहंडी सोहळ्याचा पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या वेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती.
दहीहंडी सोहळ्यासाठी विविध गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवत मानवी मनोरे उभारून सलामी दिली. गोविंदांच्या उत्साहपूर्ण घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला. उंच मानवी मनोरे उभारताना गोविंदांनी दाखवलेले कौशल्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मनोरे रचतानाचे रोमांचक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळाली.
दहीहंडी उत्सवाच्या शुभारंभासाठी पारंपरिक ढोल-ताशांच्या पथकाने विशेष सादरीकरण केले. ढोल-ताशांच्या निनादाने वातावरणात उत्साह निर्माण झाला. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या शुभारंभामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. उत्सवाच्या निमित्ताने तरुणाईमध्ये विशेष उत्साह संचारला होता.
रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, नगराध्यक्षा अक्षया नाईक, महिला आघाडी प्रमुख तथा उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ वाढवून दहीहंडी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा देत दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपली जात असल्याचे नमूद केले. दरम्यान, गोविंदा पथकांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ढोल-ताशांचा निनाद, गोविंदांचा उत्साह आणि मानवी मनोऱ्यांचे थरारक दृश्य यामुळे अलिबागमधील दहीहंडी सोहळा चांगलाच रंगतदार ठरला.









