भाजप, स्वर्गीय मधुशेठ ठाकूर आणि राजधानी रायगड दहीहंडी कडक थर लावून यशस्वीरीत्या फोडल्या
अलिबाग (प्रतिनिधी) : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने अलिबाग कोळीवाडा गोविंदा पथकाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडत विविध दहीहंडी उत्सवांमध्ये कडक थर रचून हंडी फोडण्यात यश मिळविले. पथकाच्या शिस्तबद्ध सरावाचे, संघभावनेचे आणि अथक मेहनतीचे दर्शन या कामगिरीतून घडले.
भाजप दहीहंडी, स्वर्गीय मधुशेठ ठाकूर दहीहंडी तसेच राजधानी रायगड दहीहंडी या प्रमुख उत्सवांमध्ये अलिबाग कोळीवाडा गोविंदा पथकाने उत्साहपूर्ण वातावरणात सहभाग घेतला. गोविंदांनी एकापाठोपाठ एक थर रचत मानवी मनोरे उभारले आणि योग्य नियोजन व कौशल्याच्या जोरावर दहीहंडी यशस्वीरीत्या फोडल्या.
पथकातील गोविंदांचा उत्साह, एकजूट आणि धाडसी कामगिरी पाहण्यासाठी उपस्थित नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दहीहंडीचा उत्साह आणखी वाढला.
या यशामागे पथकातील प्रत्येक गोविंदाचा सराव, मेहनत, शिस्त आणि एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा ठरला. दहीहंडी उत्सवात अलिबाग कोळीवाडा गोविंदा पथकाने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पथकातील सर्व गोविंदा, प्रशिक्षक, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. भविष्यातही पथकाने अशीच दमदार कामगिरी करून अलिबागचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.









