कोकणवासीयांचा परतीचा प्रवास महाकोंडीत; माणगाव, वडखळ, उरणमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा


रायगड (प्रतिनिधी) : गौरी-गणपती विसर्जनानंतर कोकणातून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास रविवारी रात्रीपासूनच वाहतूक कोंडीत अडकला आहे. सोमवारी कामावर पोहोचण्यासाठी हजारो नागरिक भल्या पहाटेच घराबाहेर पडल्याने मुंबई-गोवा महामार्गासह रायगड जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. अनेक प्रवाशांना सात ते साडेसात तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने परतीचा प्रवास अक्षरशः त्रासदायक ठरला आहे.

माणगाव-इंदापूरमध्ये पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. वाहनांचा वेग अत्यंत मंदावल्याने काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठीही मोठा वेळ लागत आहे.

वडखळ-रामवाडीमध्येही वाहतूक संथ
पनवेल आणि पुढे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना वडखळ आणि रामवाडी परिसरातही कोंडीचा सामना करावा लागत आहे. या भागात सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक संथगतीने सुरू आहे. कोकणातून परतणाऱ्या खासगी वाहनांसोबत एसटी बसेसची संख्या वाढल्याने रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण आणखी वाढला आहे.

उरणमध्ये पाच मिनिटांच्या अंतरासाठी दोन तास
उरण तालुक्यातील दिघोडे-दास्तान, गव्हाणफाटा-दिघोडे आणि कोप्रोली नाका परिसरातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. उरण परिसरातील वेअरहाऊस, सीएफएस आणि कंटेनर यार्डमुळे अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी अवजड वाहने आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नांमुळे वाहतुकीचा खोळंबा वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना तब्बल दोन तास ताटकळावे लागत असल्याचे चित्र आहे.

एसटी स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी
रायगड आणि रत्नागिरी विभागातील प्रमुख एसटी स्थानकांवर मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रशासनाकडून मोठ्या संख्येने जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे बसेस वेळेत स्थानकांवर पोहोचत नसल्याने प्रवाशांना मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे.

मोफत एसटी सेवांसाठी अतिरिक्त बसेस रस्त्यावर उतरल्यामुळे वाहतुकीचा भार वाढला असावा, असा अंदाज काही प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र कोंडीमागे वाढलेली खासगी वाहने, एसटी बसेस तसेच अवजड वाहनांची वर्दळ ही अनेक कारणे असल्याचे चित्र आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रायगड आणि नवी मुंबई पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. वाशी, पनवेल, खारपाडा, रबाळे तसेच प्रमुख महामार्गांवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. बिघाड झालेली वाहने तातडीने बाजूला करण्यासाठी क्रेन आणि मदत पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उपलब्धतेनुसार पर्यायी मार्गांचाही वापर केला जात आहे. उरण परिसर, पाम बीच रोड आणि अटल सेतूच्या दिशेने वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
कोकणातून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकडे परतणाऱ्या वाहनचालकांनी शक्य असल्यास गर्दीच्या मार्गांऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि महामार्गावर वाहन बिघाड झाल्यास ते शक्य तितक्या लवकर बाजूला करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, वडखळपर्यंत पोहोचलेले अनेक प्रवासी पुढे पनवेल आणि मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करत असून या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.