रायगड (प्रतिनिधी) : तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रायगड जिल्हा परिषदेतील सहायक लेखा अधिकारी योगेश प्रकाश भस्मे (वय ४६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. भस्मे हे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना भस्मे याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.
उपअधीक्षक पोलीस सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशांत धनावडे, नारायण सरोदे, पोलीस उपनिरीक्षक अरुण करकरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.









