मॅपिंग न झालेल्या मतदारांना द्यावा लागणार पुरावा; ३० सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत
अलिबाग (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी हाती घेतलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील मतदार याद्यांची तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेनंतर ३१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील भागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. डिजिटायझेशन प्रक्रियेनंतर जिल्ह्यात १९ लाख ४९ हजार ३४१ मतदार आढळून आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील ५ लाख ८४ हजार ११८ मतदारांच्या गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन न झाल्याने त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत दिसून आलेली नाहीत. तसेच ९८ हजार ३४१ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, तर १ लाख ८४ हजार २६२ मतदारांच्या नावांमध्ये बदल आढळून आल्याने त्यांना ‘अनोमली’ मतदार म्हणून नोंदविण्यात आले आहे. मॅपिंग न झालेले आणि अनोमली असे एकूण २ लाख ८२ हजार ६०३ मतदार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
या मतदारांना नोटिसा पाठवून ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. अनोमली मतदारांच्या बाबतीत पंचनामा करून आवश्यक पडताळणी केल्यानंतर त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, मॅपिंग न झालेल्या मतदारांना स्वतःचा आवश्यक पुरावा सादर करून नाव समाविष्ट करून घ्यावे लागणार आहे.
अलिबागमध्ये ४२ हजार ७६० मतदारांची नावे नाहीत
अलिबाग तालुक्यात ४२ हजार ७६० मतदारांची नावे प्रारूप यादीत आलेली नाहीत. यामध्ये अनोमली मतदारांच्या नावांची पंचनाम्याद्वारे पडताळणी करून नावे समाविष्ट केली जाणार आहेत. तर मॅपिंग न झालेल्या १८ हजार ९२५ मतदारांना स्वतःचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. पुरावा सादर केल्यानंतरच त्यांच्या नावांचा मतदार यादीत समावेश केला जाणार आहे.
जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्येही साधारण अशीच परिस्थिती आहे. मात्र, प्रारूप मतदार यादीत नावे नसलेल्या मतदारांकडून दावे-हरकती दाखल करण्याचे प्रमाण सध्या कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीत किती मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ३० सप्टेंबरनंतर प्राप्त दावे-हरकती निकाली काढल्यानंतर जिल्ह्यातील अंतिम मतदारसंख्या किती राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









