SIR विरोधात रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


अलिबाग (प्रतिनिधी) : विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेद्वारे मतदारांची नावे वगळून मोठ्या प्रमाणावर ‘मत चोरी’ होत असल्याचा आरोप करत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
बॅरिस्टर ए. आर. अंतुले भवन परिसरातून निघालेल्या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा, पक्षाचे झेंडे आणि फलक घेत घोषणाबाजी केली. दक्षिण रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ मधुकर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस ॲड. श्रद्धा ठाकूर, नंदा म्हात्रे, अलिबाग तालुकाध्यक्ष सुनील थळे यांच्यासह विविध तालुक्यांचे पदाधिकारी सहभागी झाले.
निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोप काँग्रेसने निवेदनात केला. SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळणे, आयटी प्रणालीचे केंद्रीकरण तसेच महाराष्ट्रात ४७ लाख बोगस मतदार वाढवल्याचा दावा करण्यात आला. या आरोपांची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चात अलिबागसह रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.