मुंबई (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत आळंदी, पुणे येथील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रायगडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. बचावकार्य, मदतकार्य आणि त्यानंतरची आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटना घडल्यानंतर पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांनी तत्काळ मोहीम हाती घेतली. या दुर्घटनेत आळंदी येथील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना सुनेत्रा पवार यांनी, “या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
Home ताज्या बातम्या दिवेआगर समुद्र दुर्घटनेने मन हेलावले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दुःख व्यक्त









