जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे दादा भुसे यांचे आवाहन; गुणवंत शिक्षकांचा गौरव, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
अलिबाग (प्रतिनिधी): जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देत शैक्षणिक कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला, तसेच शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्याचे आवाहन केले.
अलिबाग तालुक्यातील मुशेत, चोंडी, नाझरे हायस्कूल, आवास, नवगाव यांसह आदिवासी वाड्यांवरील शाळांना शिक्षणमंत्री भुसे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांची कार्यपद्धती, शाळांमधील शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधी यांची त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, आवडी-निवडी आणि शैक्षणिक प्रगती जाणून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.
केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत भुसे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा आणि इतर उपक्रमांनाही प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा मुख्य उद्देश शाळांमधील शैक्षणिक परिस्थिती प्रत्यक्ष जाणून घेणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि शिक्षकांच्या कामाचा दर्जा तपासणे हा आहे. शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील अडचणी समजून घेता येतात आणि त्यावर उपाययोजना करणे शक्य होते, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
या दौऱ्यादरम्यान गुणवंत शिक्षक आणि आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा देण्यात आली.
या प्रसंगी रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि शिक्षकांना प्रोत्साहन देणे या दृष्टीने शिक्षणमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला.









