आदिवासी कुटुंबांच्या घरांचे जबरदस्तीने तोडकाम; कारवाईची मागणी


दशरथ पाटील यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सर्वहारा जन आंदोलनाची मागणी

अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील माणगावळी परिसरातील आदिवासी कुटुंबांची घरे जबरदस्तीने तोडून त्यांना विस्थापित केल्याचा आरोप सर्वहारा जन आंदोलनाने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दशरथ पाटील यांच्यासह तोडकामात सहभागी असलेल्या संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रायगडच्या पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, माणगावळी येथील आदिवासी वाडीतील पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या १६ ते १८ कुटुंबांची घरे २४ मार्च २०२४ रोजी आणि त्यानंतरच्या काळात तोडण्यात आली. घरांतील सामान बाहेर काढून कुटुंबांना बेघर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काहींना आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले, तर काहींना भरपाई मिळाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.
या प्रकरणी यापूर्वी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. आदिवासी कुटुंबांच्या निवाऱ्याचा आणि हक्कांचा प्रश्न लक्षात घेऊन प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, पीडितांना न्याय मिळवून द्यावा आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वहारा जन आंदोलनाने केली आहे.