पोयनाड पोलीस ठाण्याचे पुरुष व महिला संघ प्रथम; नगराध्यक्षा अक्षया नाईक यांची उपस्थिती
अलिबाग (प्रतिनिधी) : सागरी सुरक्षेसाठी पोलीस दल, सागरी सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा २०२६’च्या दुसऱ्या पर्वाची सांगता शनिवारी अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी उत्साहात झाली.
या स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागांत पोयनाड पोलीस ठाण्याच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. पुरुष विभागात वडखळ पोलीस ठाणे द्वितीय, तर श्रीवर्धन पोलीस ठाणे तृतीय ठरले. महिला विभागात मांडवा पोलीस ठाण्याने द्वितीय, तर दिघी सागरी पोलीस ठाण्याने तृतीय क्रमांक मिळविला.
मांडवा सागरी, रेवदंडा, मुरूड आणि दिघी सागरी येथे साखळी पद्धतीने सामने पार पडले. अंतिम सामने अलिबाग समुद्रकिनारी झाले. अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला.
या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे तसेच सभापती प्रशांत नाईक आणि ऋषिकेश माळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कबड्डीतील सांघिक भावना, तत्परता आणि समन्वय हेच गुण समुद्रातील संकटांचा सामना करताना महत्त्वाचे ठरतात, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.









