अलिबाग(प्रतिनिधी): जेएनयूतील ११ विद्यार्थिनींच्या कथित लैंगिक छळ प्रकरणावरून सोमवारी अलिबागेत आंदोलन करण्यात आले. काँग्रेसविरोधात आज अलिबागमध्ये भाजप महिला आघाडीतर्फे निदर्शने करण्यात आली. काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अओकेइजाम यांच्या राजीनाम्याची आणि काँग्रेसमधून हकालपट्टीची मागणी यावेळी करण्यात आली. पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.
भाजप महिला मोर्चाच्या वतीने अलिबाग येथील भाजप मुख्यालयासमोर हे आंदोलन झाले. भाजप दक्षिण रायगड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू ) ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणात काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अओकेइजाम यांच्यावरील आरोप अधिकृत चौकशीत सिद्ध झाले असून, विद्यापीठाने त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली
यावेळी कॉंग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. प्रदेश कार्यकारीणी सदस्या मंजुषा कुद्रीमोती, पंचायत समिती सदस्या प्रियदर्शिनी पाटील, महिला मोर्चा उपाध्यक्षा आशा बोराडे, तनुजा पेरेकर, ॲड. वैशाली बंगेरा श्रेया कुंटे भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा प्रभारीयांच्यासह भाजप महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.









