अलिबाग (प्रतिनिधी) : नागाव येथील गणेश कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबागचे विद्यमान उपाध्यक्ष संजय हरिचंद्र पाटील यांचा संस्थेच्या मासिक सभेत सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष योगेश रामदास मगर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
संजय पाटील यांनी बेलकडे ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच अलिबाग तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती म्हणून काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, जनसंपर्क आणि कार्यतत्परतेच्या जोरावर त्यांनी स्थानिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या कुटुंबाला सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा वारसा लाभला असून, वडिलांनी पंचायत समिती सभापती, गणेश कृषक सेवा सोसायटीचे अध्यक्ष आणि बेलकडे ग्रामपंचायतीचे सरपंच अशी महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. हा वारसा पुढे नेत संजय पाटील यांनीही विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.
संजय पाटील हे भजनप्रेमी असून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांच्या अनुभवाचा गणेश कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या प्रगतीसाठी निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास अध्यक्ष योगेश मगर यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारीवर्गाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.









