चिल्ड्रन्स फ्युचर इंडियातर्फे मुलांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप


पेण (प्रशांत पोतदार ): दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांची दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी व्हावी, या उद्देशाने चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (CFI) संस्थेतर्फे एकूण ५,९०० प्रतिपालित व अप्रतिपालित मुलांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्था मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. दिवाळी भेटवस्तू वाटप हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
उत्कर्षनगर येथील संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुलांना विविध दिवाळी भेटवस्तू देऊन त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
यावेळी सीएफआय संस्थेचे सोशल वर्कर मुलांना भेट देण्यासाठी उपस्थित होते त्यांनी मुलांशी संवाद साधत मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच या मुलांसोबत मोठ्या संख्येने पालकवर्गही उपस्थित होता. भेटवस्तू मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
या उपक्रमामुळे मुलांच्या दिवाळीच्या आनंदात भर पडली असून, आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. तसेच मुलांची दिवाळी अधिक आनंददायी आणि संस्मरणीय केल्याबद्दल उपस्थित पालकांनी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.