रायगड जिल्ह्यात २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान जनजागृती; लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा
रायगड (प्रतिनिधी) : भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा व पारदर्शकतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात जागरूक राहावे, लाचेची मागणी झाल्यास संबंधित विभागाकडे तक्रार करावी आणि कोणत्याही शासकीय कामासाठी लाच देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना विविध कामांसाठी अनेकदा जावे लागते. अशा वेळी काही ठिकाणी काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी समोर येतात. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी अशा प्रकारांना बळी न पडता कायद्याचा आधार घ्यावा, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
‘लाच देणे व घेणे दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे,’ असा स्पष्ट संदेश विभागाने दिला आहे. कोणत्याही शासकीय दाखल्यासाठी किंवा प्रशासकीय कामासाठी लाच देण्याची आवश्यकता नाही. संबंधित काम करून घेणे हा नागरिकांचा कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे आपले काम अडवले जात असेल किंवा कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली जात असेल, तर नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ हा अभियानाचा संदेश
‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ या संदेशातून प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. शासनाच्या योजना जनतेच्या कल्याणासाठी असतात; मग त्यांचा लाभ मिळवण्यासाठी लाच कशासाठी, असा सवालही विभागाने उपस्थित केला आहे.
कामात अडथळा येत असल्यास किंवा लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हेल्पलाइन क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध आहे.
रायगड जिल्हा कार्यालयाचा संपर्क
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड कार्यालय हे पिंपळभाट, बसस्थानकाजवळ, अलिबाग येथे आहे. नागरिकांनी लाचखोरीसंदर्भातील तक्रारींसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
संकेतस्थळ: acbmaharashtra.gov.in
मोबाईल ॲप: www.acbmaharashtra.net
ई-मेल: dyspacbraigad@gmail.com
भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे लाचखोरीविरोधात आवाज उठवून प्रामाणिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.









