अलिबाग (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गो ग्रीन नर्सरी प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून अलिबाग नगर परिषदेस समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक कचरा नियंत्रणासाठी “बॉटल बिन” भेट दिली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला असून, यामुळे पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर वाढत्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. “Not The Me Earth” या संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक करण्यास मोठी मदत होणार आहे. पर्यटकांनीही या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून स्वच्छतेस हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, नगरसेवक अनिल चेपडा आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, भविष्यात अशा प्रकारचे अधिक उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली.
अलिबागला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी नागरिक, पर्यटक आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असून, “स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.






