अलिबाग नर्सेसच्या बेमुदत संपामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सेस २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संपावर गेल्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. यामुळे रुग्णांच्या उपचारांवर गंभीर परिणाम होत असून तातडीच्या सेवा जवळपास ठप्प झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या सुमारे २५० ते ३०० रुग्ण उपचार घेत असून दररोज १५० ते २०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येतात. मात्र नर्सेसच्या संपामुळे रुग्णसेवेत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आपत्कालीन सेवा प्रभावीपणे देण्यात अडथळे येत असून अनेक तातडीच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याची तक्रार नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननेही सहभाग घेतला असून जिल्हा रुग्णालयातील सुमारे १० हून अधिक नर्सेस या संपात सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णालयातील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्य प्रमुख ॲड. मानसी संतोष म्हात्रे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देत तात्काळ नर्सेसना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद ठेवणे योग्य नसून काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही संप पुकारणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
नर्सेसच्या संपामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, लवकरात लवकर सेवा सुरळीत न झाल्यास जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.