रायगड (प्रतिनिधी): राज्यात खळबळ उडवणाऱ्या रायगड हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार याला अखेर रायगड पोलिसांनी ठाणे येथून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. रविवारी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणात २२ वर्षीय पल्लवी मोरे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. आरोपीने तिला लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजवर बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती.
घटनेनंतर रायगड पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीची ओळख पटवली होती. मात्र सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अनिस मालदार हा तब्बल सहा दिवस पोलिसांना चकवा देत होता. दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आरोपीचा वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईबाबत पोलीस उपअधीक्षक शंकर काळे यांनी सांगितले की, आरोपीला पकडण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली होती आणि अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई यशस्वी करण्यात आली. तर सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली.
Home ताज्या बातम्या रायगड हत्याकांड प्रकरणात आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठाण्यातून रायगड पोलिसांची कारवाई;...






