हिरानंदानी फॉर्च्युन सिटीतील ६.३० लाखांच्या ॲल्युमिनियम प्लेट चोरी प्रकरणाचा २४ तासांत छडा; दोन आरोपी जेरबंद


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या मोठ्या चोरीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला असून, सुमारे ६ लाख ३० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम सेंट्रिंग प्लेट चोरी प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही घटना हिरानंदानी फॉर्च्युन सिटी, भोकरपाडा येथील सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी घडली. २५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास १० ते १२ अज्ञात आरोपींनी संगनमत करून टेम्पोच्या साहाय्याने सुमारे २ टन वजनाच्या ॲल्युमिनियम सेंट्रिंग प्लेट्स चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळी मिळालेल्या टायरच्या खुणा, तसेच मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील विविध सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. आरोपींनी वाहनाची नंबर प्लेट काळी करून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला होता.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित टेम्पोचा माग काढत सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचला. तेथे टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याच्या साथीदारांची माहिती समोर आली. त्यानुसार विकास रामपाल वाल्मीकी (वय २६, रा. सीबीडी बेलापूर) आणि आताउल्ला उर्फ यासीन अमजलअली खान (वय २५, रा. पळस्पे, पनवेल) या दोघांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्ह्यात वापरलेले तीन वाहने (दोन टेम्पो आणि एक कार) देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी आणखी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना आणि बांधकाम व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नेमावेत तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा.
या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.