अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधून बालकांना मराठीसोबत इंग्रजी भाषेची प्राथमिक ओळख करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेकडून घेण्यात आला आहे. पालकांचा वाढता इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे ओढा आणि त्यामुळं मराठी शाळांतील घटती पटसंख्या लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी लहान वयातच भाषेची पायाभरणी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अंगणवाडीतच मराठीसोबत इंग्रजीची तोंडओळख करून दिल्यास मुलांना पुढील शिक्षणात मोठी मदत होईल.”
सध्या ग्रामीण आणि शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती लोकप्रियता पाहता अनेक पालक आपल्या पाल्यांना लहान वयातच इंग्रजी शिक्षण देण्याकडे कल दाखवत आहेत. यामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांचा पट कमी होऊ नये, तसेच बालकांना स्पर्धात्मक वातावरणात सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
आगामी शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये इंग्रजी भाषेचे प्राथमिक धडे देण्यास सुरुवात केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार असून, बालमैत्रीपूर्ण पद्धतीने मुलांना इंग्रजीची ओळख करून दिली जाईल.
या उपक्रमामुळे बालकांमध्ये भाषिक कौशल्यांचा विकास होण्यास मदत होईल, तसेच मराठीसोबत इंग्रजीचे ज्ञानही लहान वयातच मिळणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषदेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Home ताज्या बातम्या अंगणवाड्यांतून बालकांना मराठीसोबत इंग्रजीची तोंडओळख; जिल्हा परिषदेकडून नवा उपक्रम






