
अलिबाग (प्रतिनिधी): फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेत कुरुळ येथील सु ए सो माध्यमिक विद्यालयाने ९५ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी करत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. विद्यालयातील एकूण २० विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये तीन विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली असून, पाच विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, सात विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर चार विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणीत यश मिळवले आहे. शाळेच्या यशस्वी निकालामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये चिन्मयी ज्योती अजित पाटील हिने ८३.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. पायल जया अनिल घोरपडे हिने ८२.०० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर निशा सुमित्रा युवराज राठोड हिने ७७.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कुरुळ येथील या माध्यमिक विद्यालयात बहुसंख्य अमराठी विद्यार्थी शिक्षण घेत असतानाही शाळेचा निकाल दरवर्षी उल्लेखनीय लागत असल्याचे विशेष कौतुक केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे परिश्रम, नियोजनबद्ध अध्यापन आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या यशाबद्दल शाळेचे चेअरमन ॲड. प्रसाद पाटील तसेच मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, भविष्यातही अशीच उज्वल परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.






